मलकापूर : संत गाडगेबाबा चौक परिसरात बरेच दिवसांपासून लाईट बंद आहे त्यामुळे परिसर अंधारमय झाला असून व्यापारी व नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी लाईट नसल्याने अपघात व गुन्हेगारी घटनांचा धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात संत गाडगेबाबा चौक येथील सर्व दुकानदारांनी एकत्र येत नगरपरिषद मुख्याधिकारी यांना निवेदन दिले. हायमास्ट लाईट त्वरित दुरुस्त करून सुरू करण्यात यावा, अशी त्यांनी मागणी केली. व्यापाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले की, चौकातील स्ट्रीट लाईट चे काम सुरू करण्यात आले होते मात्र ते पूर्णत्वास झालेच नाही. त्यामुळे गाडगेबाबा चौक व संपूर्ण परिसर अंधारमय झाला आहे. परिणामी नागरिक, महिला व व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. निवेदनामध्ये असेही नमूद करण्यात आले की, आता सणासुदीचे दिवस सुरु झाले आहेत. दिवाळी, दसरा यांसारख्या उत्सव काळात बाजारपेठेत नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अशा वेळी परिसर प्रकाशमान नसेल तर चोरी, अपघात यांसारख्या घटनांची शक्यता वाढेल. त्यामुळे तात्काळ हायमास्ट लाईट दुरुस्त करून सुरू करण्यात यावा, अन्यथा व्यापाऱ्यांना आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदनावर परिसरातील अनेक व्यापाऱ्यांच्या सही करण्यात आल्या असून त्याची प्रत वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठवण्यात आली आहे.