Headlines

ट्रक-दुचाकी अपघातात युवक ठार, मामा गंभीर जखमी; लग्न ठरलेल्या अजयचा जागीच मृत्यू; रस्त्यावरील बेशिस्त वाहतूक घातक

मोताळा:- लग्नाच्या तयारीचा आनंद काही क्षणातच शोकांतिका ठरली. मलकापूरकडे जात असलेल्या युवकाच्या दुचाकीला विटांनी भरलेल्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने २९ वर्षीय अजय संजय कावने याचा जागीच मृत्यू झाला. अपघातात त्याचा मामा सुरेश लोखंडे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर बुलडाणा येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही हृदयद्रावक घटना मोताळा-मलकापूर रोडवरील तालखेड फाट्यानजीक ५ मे रोजी दुपारी ११ वाजता घडली.

वडगाव (ता. मोताळा) येथील सुरेश मुरलीधर लोखंडे (वय ४५) व त्यांचा भाचा अजय संजय कावने (रा. दाताळा) हे दोघे एम.एच. १९ टीएस ००४१ या डिलक्स दुचाकीवरून मलकापूरकडे निघाले होते. दरम्यान, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या विटांनी भरलेल्या ट्रक (क्र. एम.एच. १६ ए.वाय. ०९३०) ने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेत अजयच्या मेंदूचा चेंदामेंदा होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला, तर मामा सुरेश लोखंडे यांचे दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळी उपस्थित नातेवाईकांनी आक्रोश केला. विशेष म्हणजे अजयचा विवाह लोखंडे कुटुंबातच निश्चित झाला होता. काही दिवसांतच लग्नाची तयारी सुरु होणार होती, मात्र या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

घटनेची माहिती मिळताच बोराखेडी पोलीस ठाण्याचे एपीआय शेंगेपल्लु, एएसआय शरद खर्चे व एनपीएल प्रवीण पडोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. अपघातग्रस्त ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!