मलकापूर (प्रतिनिधी) – मलकापूर तालुक्यासह संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात वाढत असलेल्या अवैध दारू विक्रीमुळे अधिकृत दारू विक्रेत्यांवर अन्याय होत असून, ही विक्री तात्काळ थांबवण्यात यावी, अशी मागणी आज ११ मार्च रोजी अधिकृत विक्रेत्यांच्या वतीने जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे उपविभागीय अधिकारी मलकापूर यांचेमार्फत निवेदनाद्वारे करण्यात आली.
या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, बुलढाणा जिल्ह्यात गेल्या काही वर्षांपासून अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात वाढली असून त्यामुळे अधिकृत विक्रेत्यांना आर्थिक नुकसानीसह अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या समस्येबाबत प्रशासनाकडे अनेक वेळा मौखिक तक्रारी करण्यात आल्या असूनही कोणतीही ठोस उपाययोजना किंवा कारवाई झालेली नाही. संपूर्ण जिल्ह्यात, विशेषतः मलकापूर, नांदुरा व खामगाव परिसरात अनेक ढाब्यांवर, अंडाभुर्जी गाड्यांवर आणि अन्य ठिकाणी, जिथे दारू विक्रीसाठी परवानगी नाही, तिथे सर्रासपणे दारू विकली जात आहे. काही ठिकाणी ग्राहकांना वायन शॉपमधून दारू स्वस्तात उपलब्ध करून दिली जाते व त्यांच्याकडून अधिक पैसे उकळले जातात. त्यामुळे अधिकृतपणे लाखो रुपये गुंतवून दुकाने सुरू केलेल्या विक्रेत्यांच्या व्यवसायावर परिणाम होत आहे. या अवैध विक्रीमुळे शासनालाही महसुली तोटा सहन करावा लागत आहे. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या बेकायदेशीर विक्रेत्यांवर कोणतीही कारवाई होत नसल्यामुळे त्यांचे मनोबल दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे अधिकृत विक्रेत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. यासंदर्भात तातडीने कारवाई करून अवैध दारू विक्री थांबवावी व अधिकृत विक्रेत्यांवरील अन्याय दूर करावा, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. अन्यथा न्यायासाठी आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही यामध्ये देण्यात आला आहे. या निवेदनावर बार मालक विरसिंह राजपूत, सोनाजी खर्चे, केदार एकडे, धनराज डवले, सुनिलसिंह राजपूत, अरूण निळे, रमेश निळे, महेश नवले, देवेंद्र पोलाखरे, रमेश उमाळकर, संजय कोलते, विजय जैस्वाल, गजानन इंगळे, विशाल जैस्वाल, दिपक गाढे, अरविंद किनगे, निना किनगे, जितेंद्रसिंह राजपूत, अक्षय राजपूत यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.