मलकापूर : बुलढाणा रोडवरील हातवळणे कॉम्प्लेक्समध्ये राहणारे सी न्यूज भारत आणि अनादी टीव्ही चॅनलचे जिल्हा प्रतिनिधी संदीप सावजी यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
संदीप सावजी हे १ मार्च ते ६ मार्चदरम्यान नातेवाईकाच्या लग्नासाठी बाहेरगावी गेले होते. ७ मार्च रोजी सकाळी घरी परतल्यावर त्यांना सांडपाण्याचे पाईप तोडलेले दिसले. यावरून चोरट्याने त्यांच्या घरात शिरण्याचा प्रयत्न केला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हातवळणे कॉम्प्लेक्स हा शहरातील मध्यवर्ती आणि सुरक्षित मानला जाणारा भाग आहे. या परिसरात मोठी ज्वेलर्स दुकाने असून चौकीदारही कार्यरत आहेत. तरीही चोरीचा प्रयत्न झाल्याने व्यापारी आणि रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याचदरम्यान, शहरातील बन्सीलाल नगर आणि घिर्णी गाव येथेही दोन-तीन ठिकाणी चोऱ्या झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चोरट्यांचा सुळसुळाट वाढला असून, त्यांना कोणाचाही धाक राहिलेला नाही, असे चित्र आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेतली. डीबी पथकाने पंचनामा करून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. शहरात वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून, पोलिसांनी कडक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.