मलकापूर: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येचे फोटो व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली असून अमानवीय पद्धतीने संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी या प्रमुख मागणीसाठी मलकापूर तालुका शिवसेनेच्या वतीने (शिंदे गट) राष्ट्रीय महामार्गावरील दसरखेड एमआयडीसी फाट्यावर तीव्र निदर्शने करत मारेकऱ्यांच्या फाशीची मागणी करण्यात आली. दरम्यान शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी वाल्मिक कराडचा पुतळा जाळून संताप व्यक्त केला.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची तीन महिन्यांपूर्वी अपहरण करून अमानवीय पद्धतीने हत्या करण्यात आली होती. माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून या हत्येच्या निषेधार्थ मलकापूर तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. हत्येचा मुख्य सूत्रधार म्हणून वाल्मीक कराड याचे नाव सीबीआयच्या आरोपपत्रामध्ये दाखल झाले असून शिवसैनिकांनी वाल्मीक कराडचा पुतळा जाळून तीव्र निदर्शने करत आंदोलन केले. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे म्हणाले की, संतोष देशमुख यांच्या हत्येचा मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड हाच असून न्यायालयाने विशेष खटला दाखल करीत सर्व आरोपींना ताबडतोब फासावर लटकवायला हवे. संपूर्ण महाराष्ट्रात या हत्येच्या निषेधार्थ जनभावनेचा मोठा आक्रोश निर्माण होत असून मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि सर्व आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्याची जोरदार मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले, तसेच वाल्मीक कराड आणि सर्व आरोपींना फासावर लटकवा तरच देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळेल असे सुद्धा तालुका प्रमुख विजय साठे यांनी म्हटले. याप्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे, कामगार सेना तालुका प्रमुख संतोष साठे, विनोद बोदडे, राजेश लांडे, जितेंद्र पाटील,सुरेश अहीर, समाधान साठे, संतोष पाटील, विष्णु महाजन, धनराज पाटील, गणेश पाटील, गजानन साठे, प्रकाश यमनेरे, संदेश शिंदे, सौरभ पाटील,अनिकेत साठे, सागर नरवाडे, रमेश वाघे, प्रवीण शेळके, ज्ञानेश्वर ठोंबे, राहुल नरोटे, प्रदीप शिंदे, गजानन एकडे सह शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, शिवसैनिक, अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड आणि आरोपींना तातडीने फाशीची शिक्षा द्या – शिवसेना तालुका प्रमुख विजय साठे
