मलकापूर:- शहरातील रेल्वे स्टेशनजवळ २४ फेब्रुवारी रोजी चाकूचा धाक दाखवून ४० हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुरुषोत्तम विष्णू कुटे (रा. पोटा, ता. नांदुरा) हा युवक पेट्रोल पंपाजवळून जात असताना दोन व्यक्तींनी त्याला अडवून चाकूचा धाक दाखवला आणि गळ्यातील चैन हिसकावून पळ काढला. याप्रकरणी पोलिसांनी तपास करून एक अल्पवयीन आरोपी आणि मुख्य आरोपी अरविंद उर्फ गबऱ्या सोळंके याला अटक केली.
न्यायालयाने गबऱ्या सोळंकेला २८ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्यानंतर २९ फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून ४० हजारांची सोन्याची चैन हस्तगत केली आहे. पुढील तपास मलकापूर शहर पोलीस करत आहेत.
चाकूचा धाक दाखवून चैन हिसकावणाऱ्या दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी, मलकापूर शहरात घडली होती घटना!
