मलकापूर : पद्मश्री डॉ. वि. भि. कोलते अभियांत्रिकी मधील “नमो ऍग्री वीर 13” या प्रकल्पाने राष्ट्रीय पातळीवर मोठी ओळख मिळवत आरडीसी 2025 आयडिया आणि इनोव्हेशन राष्ट्रीय स्पर्धेत टॉप 10 प्रकल्पांमध्ये स्थान मिळवल्याने कोलते कॉलेजसाठी हा अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण ठरला आहे. स्मार्ट फार्मिंगवरील हा प्रकल्प नवी दिल्लीत सीडीएस प्रमुख अरुण चौहान आणि माननीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या समोर यशस्वीपणे सादर करण्यात आला. प्रस्तुतीनंतर या स्पर्धेतील टॉप 10 प्रकल्पांची घोषणा करण्यात आली. या प्रकल्पांना आता पुढील टप्प्यात महानिदेशक, पंतप्रधान कार्यालय सुरक्षा आणि अधिकाऱ्यांसमोर सादर केले जाणार आहे. त्यानंतर निवडले गेलेले टॉप 5 प्रकल्प पंतप्रधान कार्यालयासमोर सादर होतील. “नमो ऍग्री वीर 13” या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाने या टॉप 10 मध्ये स्थान मिळवत महाराष्ट्राचे नाव उज्वल केले आहे.
प्रकल्पाची संकल्पना प्राध्यापक मोहम्मद जावेद यांची असून, त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि अथक परिश्रमामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला. प्रकल्पाच्या तांत्रिक अडचणी सोडवण्यासाठी प्राध्यापक सुदेश फरपट यांनी मोलाचे योगदान दिले, तर प्राध्यापक विजय ठाटे यांनी स्थापनेची व प्रोग्रामिंगची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली. कॅडेट वैभव जमडाळे यांनी प्रभावी सादरीकरण करत प्रकल्पाला नवीन उंचीवर नेले.
प्राध्यापक जावेद यांनी हे यश संपूर्ण टीमच्या मेहनतीला आणि कोलते महाविद्यालयाच्या प्रबंधनाला अर्पण केले आहे. त्यांनी प्राचार्य डॉ. अनिल खर्चे, प्रशासकीय डीन डॉ. युगेश खर्चे, डॉ. संजय हरगुनानी, मायक्रोस्पेक्ट्रा सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड, श्री. दीपक पालवे आणि कोलते महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारी वर्गाचे आभार मानले.
संस्थेचे अध्यक्ष श्री. डी. एन. पाटील उपाख्य नाना साहेब पाटील, उपाध्यक्ष श्री. प्रदीप कोलते, सचिव डॉ. अरविंद कोलते आणि इतर सर्व सदस्यांनी टीमचे अभिनंदन केले. या यशाने कोलते महाविद्यालयाच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा एक अध्याय जोडला आहे. “नमो ऍग्री वीर 13” प्रकल्पाने महाराष्ट्राच्या तांत्रिक कौशल्याचा आणि नवकल्पनांचा राष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवला आहे.