Headlines

दरोडेखोरांचा हैदोस; पशुवैद्यकीय डॉक्टरच्या पत्नीचा खून, डॉक्टर गंभीर जखमी, मोताळा तालुक्यातील दाभाडी येथील घटना!

 

मोताळा :- तालुक्यातील दाभाडी येथे आज, १९ जानेवारी रोजी पहाटे दरोडेखोरांनी पशुवैद्यकीय डॉक्टर गजानन टेकाळे यांच्या घरी दरोडा टाकत त्यांची पत्नी माधुरी टेकाळे यांची क्रूरपणे हत्या केली. या घटनेत गजानन टेकाळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर तातडीने रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मध्यरात्रीच्या सुमारास टेकाळे दाम्पत्याच्या घरात दरोडेखोरांनी प्रवेश करून मालमत्तेची लूट सुरू केली. विरोध केल्याने माधुरी टेकाळे यांचा जीव घेतला गेला, तर गजानन टेकाळे यांना गंभीर जखमी करून बेहोश अवस्थेत सोडले. त्यावेळी टेकाळे यांची मुलगी कु. वेदिका सहलीसाठी बाहेर गेली होती.
सकाळी पाच वाजता गजानन टेकाळे यांच्या भावाच्या पत्नी दूध आणण्यासाठी घरात गेल्या असता पती-पत्नी बेशुद्ध अवस्थेत आढळले. घटनेची माहिती त्वरित गावकऱ्यांना कळवण्यात आली. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा, श्वान पथक, फॉरेन्सिक तज्ञ, तसेच बोराखेडी, मलकापूर व एमआयडीसी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. सखोल तपास सुरू आहे.

कुटुंबावर दुःखाचा डोंगर.

घटनेच्या तीन दिवसांपूर्वीच कु. वेदिका हिचा वाढदिवस टेकाळे दाम्पत्याने संपूर्ण गावाला जेवण देत आनंदाने साजरा केला होता. मात्र अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे महत्त्वाचे ठरले असते..

गजानन टेकाळे यांनी काही दिवसांपूर्वी घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा निर्णय घेतला होता, मात्र कामाच्या व्यापामुळे ते लावले गेले नव्हते. हा निष्काळजीपणा या प्रकरणात निर्णायक ठरला असता, अशी चर्चा आहे.

डॉक्टराची प्रकृती चिंताजनक..

सध्या गजानन टेकाळे यांना गंभीर जखमी अवस्थेत जळगावच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत गावकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.
गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून, या घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!