Headlines

रात्री सापडला नातवाचा मृतदेह, सकाळी आजोबाने केली आत्महत्या

उमरखेड ( यवतमाळ) : दुपारपासून घरातून बेपत्ता झालेल्या चार वर्षीय बालकाचा मृतदेह रात्री एका शेतात सापडला, तर लगेच सकाळी त्याच्या आजोबानेही गळफास लावून आत्महत्या केली. ही विचित्र घटना तालुक्यातील दिघडी गावात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. गौरव गजानन शिंदे (वय ४) आणि अवधूत राजाराम शिंदे (६२) असे या घटनेतील मृतक नातू आणि आजोबाचे नाव आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव हा शनिवारी दुपारी २ वाजतापासून बेपत्ता होता. तो गावात कुठेतरी खेळत असावा, असे गौरवच्या आई-वडिलांना वाटले. मात्र, सायंकाळी ५ वाजेपर्यंत तो दिसला नाही म्हणून आई-वडिलांनी व गावकऱ्यांनी गौरवचा सर्वदूर शोध सुरू केला. रात्री ८ वाजताच्या दरम्यान गौरव एका उसाच्या शेतात मृतावस्थेत आढळून आला. त्याचा गळा आवळून खून केला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. नातवाला शोधण्यासाठी आजोबाही फिरले…. आजोबा अवधूत शिंदे हेसुद्धा गौरवला शोधण्यासाठी गावकऱ्यांसोबत फिरत होते. चार वर्षांच्या या चिमुकल्याची हत्या कोण केली असणार, याची चर्चा दिघडी गावात सर्वत्र पसरली होती. रविवारी सकाळी ६ वाजता मृतक गौरवच्या आजोबांनी गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना गावकऱ्यांना कळताच विविध प्रकारच्या चर्चांना उधाण आले. आजोबा अवधूत राजाराम शिंदे यांनी राहत्या घरी गळफास लावून स्वतःला संपविले. उमरखेड उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांनी घटनास्थळाला भेट दिली असून, पुढील तपास ठाणेदार संजय सोळुंके यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!