बुलढाणा :- मकर संक्रांतीच्या कालावधीत पतंगबाजीचा उत्साह वाढत असतो. यावेळी मोठ्या प्रमाणावर नायलॉन मांजाचा वापर केला जातो, जो मानवी जीव, पशु-पक्षी यांच्यासाठी प्राणघातक ठरत आहे. अशा घटनांमुळे जखमी आणि मृत्यूंच्या प्रमाणात सातत्याने वाढ होत आहे.पर्यावरण (संरक्षण) अधिनियम १९८६ नुसार, बुलढाणा जिल्ह्यात नायलॉन मांजाच्या वापरावर, विक्रीवर आणि निर्मितीवर कडक बंदी घालण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व घाऊक व किरकोळ विक्रेते तसेच साठवणुकदारांना नायलॉन मांजाच्या साठवणुकीसाठी आणि विक्रीसाठी प्रतिबंध करण्यात आले आहे.
आदेशाची अंमलबजावणी..
जिल्हाधिकारी यांनी स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस विभागांना स्वतंत्र पथके तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या पथकांकडून अशा प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.
कायदेशीर कारवाईचे प्रावधान..
या आदेशाचा भंग करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती अथवा संस्थेवर पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ चे कलम १५ अंतर्गत शिक्षेस पात्र गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी या आदेशांचे पालन करून जिल्ह्यातील पर्यावरण रक्षणासाठी सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.