संग्रामपूर : – तालुक्यातील पळशी झाशी शिवारात विहिरीचे खोदकाम करताना मोठी दुर्घटना घडली. खोदलेल्या मातीने भरलेला लोखंडी टप क्रेनच्या वायरोप तुटल्याने थेट मजुराच्या डोक्यावर पडला. या घटनेत विनोद मनोहर सावदेकर (वय ३९, रा. पळशी झाशी) या मजुराचा जागीच मृत्यू झाला. हा प्रकार २४ डिसेंबर रोजी सकाळी ९:३० वाजताच्या सुमारास घडला.मृत विनोद सावदेकर हे त्यांच्या मामांच्या शेतात इतर मजुरांसोबत विहिरीचे खोदकाम करत होते. खोदलेल्या मातीला क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू असताना अचानक वायरोप तुटला आणि मातीने भरलेला लोखंडी टप त्यांच्या डोक्यावर पडला. या दुर्घटनेत इतर दोन मजूर थोडक्यात बचावले.घटनेनंतर तामगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. याप्रकरणी तामगाव पोलिस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला असून, पुढील तपास बीट जमादार प्रमोद मुळे करत आहेत.या घटनेने पळशी झाशी परिसरात शोककळा पसरली आहे.