मलकापूरः बुलढाणा रोडवरील एचडीएफसी बँकेसमोर एका तरुणाने सुसाट दुचाकी चालवून एका वृद्धाला धडक दिल्यानंतर संतप्त जमावाने त्याला बेदम धुतले. ही घटना आज सायंकाळी सहा वाजता घडली. या बाबत सविस्तर वृत्त असे की, दिवाळीच्या सणानिमित्ताने मलकापूर शहरात खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या दरम्यान, होंडा कंपनीची युनिकॉर्न दुचाकी चालवत असलेला एक तरुण बुलढाणा रोडवर सुसाट गाडी चालवत होता. त्याच्या गाडीचा कट एका वृद्धाला लागला, ज्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाला. वाद वाढत असतानाही त्या तरुणाने उपस्थित नागरिकांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतप्त झालेल्या जमावाने त्याला पकडून मारहाण केली. या हाणामारीत त्याचे कपडे फाटले. घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी पोहोचले आणि त्या तरुणाला ताब्यात घेतले. या घटनेमुळे वाहतुकीची मोठी अडचण निर्माण झाली होती, मात्र वाहतूक पोलिसांनी तत्काळ मार्ग मोकळा करून वाहतूक सुरळीत केली.