Headlines

मलकापूर विधानसभा मतदारसंघातून युवक काँग्रेसच्या माध्यमातून मला उमेदवारी द्यावी – संभाजी शिर्के यांची पक्षश्रेष्ठींकडे मागणी

मलकापूर:- विधानसभा मतदार संघामध्ये युवक काँग्रेसच्या कार्याची दखल घेत या मतदार संघातून युवक काँग्रेसच्या माध्यमातून मला उमेदवारी देण्यात यावी, अशी अपेक्षा महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे प्रवक्ता संभाजी शिर्के (देशमुख) यांनी १३ ऑक्टोबर रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून व्यक्त केली. मलकापूर विधानसभा मतदार संघामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये युवक काँग्रेसने महत्वाची भूमिका बजावून आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. तसेच भारतीय राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाचे संघटन अधिक मजबुत करण्याकरीता तसेच महाराष्ट्रातील अभद्र युती शासनाच्या विरुध्द जनतेच्या व युवकांच्या प्रश्नांकरीता आक्रमकपणे आंदोलन, धरणे व इतर कार्यामध्ये युवक कॉंग्रेस नेहमीच अग्रस्थानी राहिले आहे. भारत जोडो यात्रेमध्ये सुध्दा युवक कॉंग्रेसचा महत्वपुर्ण सहभाग राहीला आहे. तसेच जन सामान्यांसह विद्यार्थी, महिला, शेतकरी कामगार, शेतमजुर यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी युवक काँग्रेसची भूमिका ही महत्वाची राहिली आहे. मी गत् ८ ते ९ वर्षापासून मलकापुर विधानसभा मतदार संघामध्ये सामाजिक, राजकीय, धार्मीक, क्रिडा, शैक्षणिक, कृषि, कामगार, यांच्याशी निगडीत सर्वच क्षेत्रामध्ये काम करीत असून गेली अनेक वर्षापासून गावातील भागवत किर्तन सप्ताह, गणपती उत्सव, दुर्गा उत्सव,

आदी सणांमध्ये मी किर्तनाच्या माध्यामातून प्रबोधन व सेवा करीत असल्यामूळे तसेच शिवमठाचे मठाधिपती म्हणून हिंदु समाजामध्ये मला एक किर्तनकार म्हणून मानाचे स्थान आहे. तसेच मी दलित समाजाच्या डॉ. बाबासाहेब आंडेबडकर, महात्मा ज्योतीबा फुले, सावित्रीबाई फुले, बुध्द जयंती या सारख्या कार्यक्रमामध्ये सुध्दा मला सामाजिक प्रबोधनासाठी निमत्रीत केले जाते. त्यामुळे या समाजातील जनता सुध्दा माझ्याशी जुळलेली आहे. त्याच सोबत मुस्लीम समाजाचे मोहरम, ईद, आदी सारख्या कार्यक्राममध्ये मी शांतता कमिटीच्या माध्यमातून माझे सर्वांशी संबंध जोपासले गेलेले आहेत. माझ्या कार्याचा विचार करता मला युवक कॉंग्रेसच्या माध्यमातून उमेदवारीकरीता प्राधान्य दिल्यास महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसमध्ये सुध्दा एक नवचैतन्य निर्माण होवून अनेक युवकांना सुध्दा एक वेगळा संदेश जाईल. तसेच या मतदार संघात मी केलेल्या कार्यामुळे पक्षाचा उमेदवार हा निश्चीत निवडुन येईल यात तिळमात्र शंका नसल्याचेही यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
तसेच माझ्या कार्याची दखल घेवून पक्षाने उमेदवारी दिली नाही तरी मी एक पक्षाचा सामान्य कार्यकर्ता म्हणून पक्ष जो कुणी उमेदवार देईल त्याचा मी प्रामाणिकपणे प्रचार करुन उमेदवार निवडणूक आणण्यासाठी तत्पर राहील, असेही त्यांनी यावेळी शेवटी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!