जलंब : दोन युवकांना विद्युत तारेचा शॉक लागल्याने दोघांचाही जागेवरच मृत्यू झाला. ही घटना ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास नजीकच्या डोलारखेड येथे घडली.
येथून जवळच असलेल्या डोलारखेड येथे नवरात्रोत्सवानिमित्त नवदुर्गाची स्थापना करण्यात आली आहे. येथील एका सार्वजनिक उत्सव मंडळाच्या वतीने सायंकाळी घटस्थापना होऊन आरतीही झाली. यानंतर शुभम गजानन देठे (वय २१) व गोवर्धन संतोष देठे वय २०) हे युवक मंडपाला फेन्सिंग लावण्यासाठी गेले. यादरम्यान अचानक विद्युत तारेला स्पर्श झाल्याने दोघांनाही विजेचा जोरदार धक्का बसला. यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दोघेही युवक मंडळाचे सक्रिय सदस्य होते. त्यांच्या मृत्यूमुळे देठे परिवारासह संपूर्ण परिसरात व मंडळावर शोककळा पसरली.