जांभोरा : सिंदखेडराजा तालुक्यातील जांभोरा येथील राहेरी ते शेवली मार्गावर असलेल्या डॉ. शरदचंद्र देशमुख यांच्या रुग्णालयाचा दरवाजा तोडून चोरट्यांनी रोकड, सीसी कॅमेरे व इतर साहित्य लंपास केल्याची घटना १ ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. जांभोरा येथे राहेरी येथील डॉ. शरदचंद्र देशमुख यांच्या मालकीचे रुग्णालय आहे. अज्ञात चोरट्याने ३० सप्टेंबरला मध्यरात्री रुग्णालयाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला व डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये प्रवेश करत सुमारे चार हजार रुपयांची रोकड लंपास केली. तसेच सीसीटीव्हीचे साहित्यही लंपास केल्याचे निदर्शनास आले आहे. १ ऑक्टोबर रोजी सकाळी हा प्रकार लक्षात आला. किनगाव राजा पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.