मलकापूर : कामानिमित्त मलकापूर शहरात आलेल्या विवाहितेच्या पर्समधून सोन्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. शहरातील कोहीनूर हॉटेलसमोरील रस्त्यावरून जात असताना अज्ञात चोरट्याने संधी साधून पर्समधील सोन्याचे दागिने लंपास केले. या चोरीत ४० हजार रुपयांचे दागिने चोरीस गेल्याने महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. माहीम शेख जुनेद (रा. शाहीन कॉलनी, नांदुरा) या २१ नोव्हेंबर रोजी कामानिमित्त मलकापूर येथे आल्या होत्या. दुपारी सुमारे १.३० वाजता त्या शहरातील कोहीनूर हॉटेलसमोरील रस्त्याने पायी जात असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या पर्सवर हात साफ केला. पर्समधील ३ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, किंमत १५ हजार रुपये, तसेच ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले, किंमत २५ हजार रुपये असा एकूण ४० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध अप.क्र. ८९२/२०२६, कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.