मलकापूर : – बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने मलकापूर तालुक्यातील वाकोडी शिवारातील महावीर नगर परिसरात सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायावर धडक कारवाई करत दोन पुरुष आरोपींसह एका महिलेला ताब्यात घेतले. या कारवाईत दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, रोख रक्कम, मोबाईल व इतर साहित्य असा एकूण ३३ हजार १६५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, महावीर नगर परिसरातील एका घरात महिलांना ठेवून अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत छापा टाकला. कारवाईदरम्यान घरात एक ग्राहक तसेच दोन महिला आढळून आल्या.
या प्रकरणी संतोष हरिभाऊ वाघ, उखर्डा पांडुरंग तांदूळकर आणि एका महिलेला ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुद्ध अनैतिक देहव्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छाप्यात पोलिसांनी २ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम, तीन मोबाईल फोन आणि इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, श्रेणिक लोढा तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी आनंद महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
या कारवाईत एपीआय यशोदा कणसे, हेड कॉन्स्टेबल राजेंद्र टेकाळे, अनुपकुमार मेहेर, सतीश हाताळकर, विजय वारुळे, पोलीस कॉन्स्टेबल अमोल वनारे, मंगेश सनगाळे, महिला पोलीस कॉन्स्टेबल कोमल इंगळे, दिपाली चव्हाण, समाधान टेकाळे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.