हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह आठ जणांविरुद्ध गुन्हा; शेताला कंपाउंड व मोबाइल शॉपीसाठी १० लाखांची मागणी

जळगाव जामोद :- लग्नात हुंडा कमी दिला तसेच मानपान योग्यरीत्या केले नसल्याचे कारण पुढे करत एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या आठ जणांविरुद्ध जळगाव जामोद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेताला कंपाउंड बांधण्यासाठी आणि नवीन मोबाइल शॉपी सुरू करण्यासाठी माहेराहून १० लाख रुपये आणण्याचा तगादा लावण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पळसखेड येथील अर्चना उत्कर्ष खोटरे (वय ३२) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. त्यांचा विवाह ७ मार्च २०२५ रोजी अकोला येथील उत्कर्ष गजानन खोटरे यांच्याशी झाला होता. विवाहावेळी मुलीच्या कुटुंबीयांनी सोन्याचे दागिने व रोख रक्कम देत लग्नावर मोठा खर्च केला होता. मात्र लग्नानंतर काही दिवसांतच पती, सासू-सासरे व इतर नातेवाईकांनी हुंडा कमी दिल्याचा आरोप करत त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार मानसिक छळ करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. शेताला कंपाउंड बांधणे व मोबाइल शॉपी सुरू करण्यासाठी माहेराहून आणखी १० लाख रुपये आणावेत, अशी मागणी करण्यात येत होती. तक्रारीनुसार, २८ मे २०२५ रोजी पैशांच्या कारणावरून पतीने मारहाण केली. त्यानंतर पीडित महिला माहेरी राहत होती. समेटासाठी गेलेल्या माहेरच्या नातेवाईकांनाही धमकावण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच सासरी परत गेल्यानंतर घरात प्रवेश नाकारण्यात आला. मुख्य गेटला कुलूप लावून घरात घेतले नाही, तर दुसऱ्या वेळी दिवसभर दारात बसवून ठेवून शिवीगाळ केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. या प्रकरणी जळगाव जामोद पोलिसांनी उत्कर्ष गजानन खोटरे, गजानन पुंडलिक खोटरे, मंदागिनी गजानन खोटरे, प्रज्ञा शरद काकड, शरद प्रभाकर काकड, प्रीती विलास चांदने, विलास बाबाराव चांदने आणि राम खोटरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार भागवत उबरहंडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!