खामगाव :- गोमांस विक्री होत असल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे शिवाजीनगर पोलिसांनी शहरातील फाटकपुरा, दालफैल आणि मस्तान चौक परिसरात धडक कारवाई करत तिघा आरोपींना अटक केली. या कारवाईत कत्तल केलेले गोवंशाचे मांस, जिवंत गोवंश आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण १ लाख २४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित परिसरात बेकायदेशीररीत्या गोमांस विक्री सुरू असल्याचे समोर आले होते. त्यानुसार २३ मे रोजी पोलिसांनी पथकासह छापे टाकले. फाटकपुरा व दालफैल परिसरातील शेख अहमद शेख समद यांच्या घरातून अंदाजे ७० किलो गोवंशाचे मांस, सात जिवंत बैल आणि कत्तलीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले. तर मस्तान चौक परिसरातील शेख आजम कुरेशी यांच्या घरातून सुमारे ५० किलो गोवंशाचे मांस व संबंधित साहित्य जप्त करण्यात आले. कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेले कत्तल केलेले मांस नगरपरिषदेच्या मदतीने नष्ट करण्यात आले. तसेच जिवंत अवस्थेत आढळून आलेल्या गोवंशांना पुढील देखभालीसाठी गोशाळेत पाठविण्यात आले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६, प्राण्यांना क्रूरतेने वागविणे प्रतिबंधक अधिनियम १९६० तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणात शेख अहमद शेख समद, शेख आझाद शेख फत्ता आणि शेख आजम कुरेशी शेख मुसा कुरेशी या तिघांना अटक करण्यात आली असून पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करीत आहेत.