Headlines

खामगावात कौटुंबिक वादाचा दुर्दैवी अंत; बॅटने मारहाणीत पत्नीचा मृत्यू, पती अटकेत

खामगाव : चारित्र्याच्या संशयातून पती-पत्नीमध्ये झालेला वाद टोकाला गेल्याने पतीने पत्नीवर बेसबॉलच्या बॅटने हल्ला केल्याची धक्कादायक घटना गोपाळ नगर घरकुल परिसरात ३० ऑगस्ट रोजी रात्री घडली. या मारहाणीत २६ वर्षीय पत्नीचा मृत्यू झाला. घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी पतीला अटक केली असून त्याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश महादेव डाबेराव (२६) आणि त्यांची पत्नी लक्ष्मी गणेश डाबेराव (२६) हे गोपाळ नगर घरकुल परिसरात राहत होते. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्या घरातून आरडाओरड ऐकू आल्याने शेजाऱ्यांनी घराकडे धाव घेतली. त्यावेळी गणेश पत्नी लक्ष्मी यांना बॅटने मारहाण करत असल्याचे आढळून आले.
चारित्र्याच्या संशयावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर संतापलेल्या गणेशने लक्ष्मी यांच्या डोक्यासह हात व पायावर बॅटने मारहाण केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. गंभीर दुखापत झाल्याने लक्ष्मी यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी खामगाव येथील उपजिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.
या प्रकरणी रोहन देवीदास घोडाम यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी गणेश डाबेराव याला अटक केली.
दरम्यान, या घटनेमागील नेमका वाद, हत्येचा संपूर्ण घटनाक्रम आणि हल्ल्यात वापरण्यात आलेल्या बॅटसह इतर बाबींचा तपास शिवाजीनगर पोलिसांकडून सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!