खामगाव : तालुक्यातील गवळी रोड परिसरात मजुरांवर काठ्यांनी हल्ला करून जातिवाचक शिवीगाळ व धमकावल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात तिघेजण जखमी झाले असून, खामगाव ग्रामीण पोलिसांनी दोन नामनिर्देशित आरोपींसह १० ते १२ जणांविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
गवळी रोड परिसरात मजुरांवर हल्ला करून जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी दोन नामनिर्देशित आरोपींसह १० ते १२ अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत गणेश वानखडे, अर्जुन वानखडे, रघुनाथ बारसकर आणि चेतन विटे हे जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गणेश जनार्धन वानखडे (वय ४९, रा. बाळापूर फैल, खामगाव) हे २४ मे रोजी सायंकाळी पिंप्री-गवळी रोड परिसरातून जात असताना टेंभुर्णा येथील काही जण त्यांच्या दिशेने धावत आले. आरोपींनी नाव विचारल्यानंतर फिर्यादी व त्यांच्यासोबत असलेल्या मजुरांना काठ्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्लेखोरांपासून बचाव करण्यासाठी फिर्यादी व मजूर बुलढाणा वेअरहाऊस परिसराकडे गेले. मात्र आरोपींनी तेथेही त्यांचा पाठलाग करून जातिवाचक शिवीगाळ केली तसेच जीवे मारण्याच्या धमक्या देत पुन्हा हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी सागर रमेश टिकार, त्याचा भाऊ (दोघेही रा. टेंभुर्णा, ता. खामगाव) तसेच इतर १० ते १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.