मलकापूर : मोबाईलवर फोटो पाठविण्याच्या कारणावरून सुरू झालेला वाद थेट मारहाण आणि घराच्या तोडफोडीपर्यंत पोहोचल्याची घटना हिंगणा काझी येथे घडली. एका महिलेला चौघांनी मिळून शिवीगाळ करत मारहाण केल्याचा आरोप असून, घराच्या दरवाजाचेही नुकसान करण्यात आले. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मुमताज बेगम मोइनोद्दीन, रा. हिंगणा काझी, ता. मलकापूर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास गावातीलच नात्यातील इसलाउद्दीन तकीउद्दीन, शरीकउद्दीन इसलाउद्दीन, अमीनउद्दीन इसलाउद्दीन आणि तमीजउद्दीन तकीउद्दीन हे चौघे त्यांच्या घरी आले. मुलाने अबुबकर शहाबुद्दीन यांच्या मोबाईलवर फोटो का पाठविले, असा जाब विचारत त्यांनी वाद घातला. त्यानंतर चौघांनी संगनमत करून अश्लील शिवीगाळ केली व लाथा-बुक्क्यांनी तसेच चापटांनी मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. यावेळी मुलाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, तसेच घराच्या दरवाजाची तोडफोड करून नुकसान करण्यात आले. या घटनेप्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अप.क्र. २४२/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम २९६, ११५(२), ३५२, ३५१(२)(३), ३२४(२) व ३(५) अन्वये चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.