मलकापूर : घरासमोर खेळणाऱ्या अवघ्या दोन वर्षांच्या चिमुकल्याला अनोळखी महिला सोबत घेऊन जात असल्याचा प्रकार समोर आल्याने पारपेठ परिसरात खळबळ उडाली. शेजारी राहणाऱ्या महिलेने प्रसंगावधान राखत संशयित महिलेला वेळीच हटकले. त्यामुळे चिमुकल्याला सुरक्षित ठेवण्यात यश आले. या प्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी एका महिलेविरुद्ध अपहरणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. मलकापूर शहरातील मुस्ताक अली नगर, पारपेठ परिसरात शेख सादिक शेख बशीर यांचा दोन वर्षीय मुलगा शेख नोमान हा २१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घरासमोरील रस्त्यावर खेळत होता. याच वेळी एक अनोळखी महिला तेथे आली. तिने कोणालाही काही न सांगता चिमुकल्याला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. महिला चिमुकल्याला घेऊन जात असल्याचे शेजारी राहणाऱ्या तानियाबी यांच्या निदर्शनास आले. त्यांना संशय आल्याने त्यांनी तातडीने धाव घेत महिलेला अडवून जाब विचारला. यावेळी संबंधित महिलेने आपले नाव शबनम खानम, रा. ग्रामीण पोलीस स्टेशनसमोर, पारपेठ, मलकापूर असे सांगितले. मात्र, विचारपूस होताच तिने तेथून पळ काढला. या घटनेनंतर शेख सादिक शेख बशीर यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून मलकापूर शहर पोलिसांनी अप.क्र. ८९४/२०२६ अन्वये कलम १३७(२), ६२ बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.