मलकापूर : घरापासून दूर राहून शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आलेल्या एका तरुणाचा प्रवास अचानक संपल्याने हळहळ व्यक्त होत आहे. झेरॉक्स आणण्यासाठी जात असल्याचे सांगून मित्रांच्या खोलीतून बाहेर पडलेला अभियांत्रिकीचा विद्यार्थी रात्रभर परतलाच नाही. मित्रांनी शोधाशोध केली, कुटुंबीय मलकापुरात धावून आले, सीसीटीव्हीच्या आधारे त्याचा माग काढण्याचा प्रयत्न झाला; मात्र रविवारी सायंकाळी धरणगाव परिसरातील शेतात त्याचा मृतदेह आढळून आला. समाधान सुनील म्हस्के (रा. पांढरदेव, ता. चिखली) या विद्यार्थ्याच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, या घटनेमागील कारण अद्याप अनुत्तरित आहे. समाधान मलकापूर येथील व्ही. बी. कोलते अभियांत्रिकी महाविद्यालयात द्वितीय सत्रात शिकत होता. शिक्षणासाठी तो मलकापूर ग्रामीण ग्रामपंचायत हद्दीतील गजानन नगरी येथे मित्रांसोबत भाड्याच्या खोलीत वास्तव्यास होता. शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वर्गमित्राची दुचाकी घेऊन तो बाहेर पडला. झेरॉक्स आणण्यासाठी जात असल्याचे त्याने मित्रांना सांगितले होते. मात्र, रात्री दहा वाजेपर्यंत तो परत न आल्याने मित्रांना काळजी वाटू लागली. त्यांनी त्याच्या आई-वडिलांना संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर मित्रांनी रात्रभर परिसरात आणि संभाव्य ठिकाणी शोध घेतला, पण समाधानचा काहीच मागमूस लागला नाही. रविवारी सकाळी त्याचे वडील सुनील म्हस्के आणि मामा मलकापुरात दाखल झाले. समाधान कुठे गेला, याचा शोध घेण्यासाठी महाविद्यालय परिसरातील तसेच शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यामध्ये तो शनिवारी सायंकाळी महाविद्यालयासमोरून धरणगावच्या दिशेने जात असल्याचे दिसून आले. या माहितीच्या आधारे त्या परिसरात शोध घेतला असता, त्याने नेलेली दुचाकी आढळली. जवळच्या शेतात शोध घेतल्यानंतर समाधानचा मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस उपनिरीक्षक सतीश बेले यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. आवश्यक पंचनाम्यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. समाधानच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, या घटनेने त्याच्या कुटुंबीयांसह मित्रांमध्ये शोककळा पसरली आहे.