मे. बु. : वडिलांसोबत स्कुटीवरून प्रवास करणाऱ्या अडीच वर्षांच्या चिमुकलीवर काळाने घाला घातला. पाठीमागून आलेल्या भरधाव अज्ञात वाहनाने स्कुटीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात वडिलांचा मृत्यू झाला, तर सुदैवाने चिमुकली या अपघातातून बचावली. ही हृदयद्रावक घटना १३ जून रोजी माळी खुर्द फाट्याजवळ घडली. अंढेरा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रवी बोरकर हे स्कुटी क्रमांक एमएच ३७ यू ८९३६ वरून आपल्या अडीच वर्षांच्या मुलीला घेऊन मे. खुर्द येथून चिखलीकडे जात होते. दरम्यान, पाठीमागून आलेल्या एका भरधाव अज्ञात वाहनाने त्यांच्या स्कुटीला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की, रवी बोरकर आणि चिमुकली दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात रवी बोरकर गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडले, तर चिमुकलीला सुदैवाने जीवदान मिळाले. याचदरम्यान तेथून जात असलेले अंढेरा पोलीस ठाण्याचे कर्मचारी सोनकांबळे यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता जखमींना रुग्णालयात पोहोचविण्यासाठी वाहनांची मदत मागितली. मात्र, अनेक वाहनांना थांबविण्याचा प्रयत्न करूनही मदत मिळाली नाही. अखेर त्यांनी एका खासगी वाहनातून दोघांनाही चिखली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती रवी बोरकर यांना मृत घोषित केले, तर चिमुकलीवर उपचार सुरू आहेत. वडिलांचा दुर्दैवी मृत्यू आणि चिमुकलीच्या बचावाच्या या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.