सिंदखेडराजा : घाटमार्गावरील प्रवास दोन तरुणांसाठी अखेरचा ठरला. शेलू भोसा घाटात ट्रॅक्टर उलटून झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, निष्काळजी वाहन चालविणे अपघातास कारणीभूत ठरल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास शेलू भोसा घाटातून एमएच २१ सी ४४१८ क्रमांकाचे ट्रॅक्टर जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर पलटी झाले. या ट्रॅक्टरमधून प्रवास करणारे माऊली अनंतराव दवणे (वय २१) आणि महेश प्रकाश रणवीर (वय १५, दोघेही रा. केहाळवडगाव, ता. मंठा, जि. जालना) गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. याप्रकरणी १० नोव्हेंबर रोजी संबंधित कलमान्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार संजय डोंगरे करीत आहेत.