मलकापूर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नसून, पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. भरधाव प्रवासादरम्यान वाहनावरील नियंत्रण सुटल्याने दुचाकी थेट महामार्गाच्या दुभाजकावर आदळली. या अपघातात तरुण गंभीर जखमी झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. कृष्णा धाडे (रा. म्हैसवाडी, ता. मलकापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो आपल्या वाहनाने जात असताना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील पॉवर पंपाजवळ त्याच्या वाहनाची दुभाजकाला जोरदार धडक बसली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. घटनेनंतर त्याला उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, मलकापूर येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. उपजिल्हा रुग्णालयातील अधिकारी डॉ. सुनीता रोकडे यांच्या सूचनेनुसार कक्षसेवक तसलीम शेख अब्दुल नबी यांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार मलकापूर शहर पोलीस ठाण्यातून शून्य क्रमांकाने आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास एएसआय टेकाडे करीत असून, एमआयडीसी दसरखेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक २६/२०२६, कलम १९४ बीएनएसएस अन्वये नोंद करण्यात आली आहे.