नांदुऱ्यात इंडस टॉवरमधील बॅटरी चोरीचा प्रयत्न उधळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा, तिघांना अटक, ४ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त; बोलेरोसह चोरीचे साहित्य पोलिसांच्या ताब्यात
नांदुऱ्यात इंडस टॉवरमधील बॅटरी चोरीचा प्रयत्न उधळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा, तिघांना अटक, ४ लाख ३८ हजारांचा मुद्देमाल जप्त; बोलेरोसह चोरीचे साहित्य पोलिसांच्या ताब्यात
नांदुरा : मोबाईल टॉवरमधील महागड्या साहित्यावर चोरट्यांनी डल्ला मारण्याचा प्रयत्न केला; मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न उधळून लावण्यात आला. नांदुरा-वडी फाटा परिसरातील इंडस टॉवरच्या स्टोअर रूममध्ये लाखो रुपये किमतीच्या बॅटऱ्या चोरण्याच्या प्रयत्नाचा नांदुरा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यापैकी तिघांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. आरोपींकडून बोलेरो वाहनासह चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ४ लाख ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ८ नोव्हेंबर रोजी पहाटे २.३० वाजताच्या सुमारास नांदुरा-वडी फाटा परिसरातील इंडस टॉवरच्या स्टोअर रूममध्ये चोरीचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी चोरट्यांनी एचबीएल कंपनीच्या ६०० एएच क्षमतेच्या २४ बॅटऱ्या चोरण्याचा प्रयत्न केला. एका बॅटरीची किंमत १२ हजार रुपये असून, सर्व बॅटऱ्यांची एकूण किंमत २ लाख ८८ हजार रुपये आहे. याशिवाय टॉवरची तोडफोड करून अंदाजे ३ लाख रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. घटनास्थळावरून सात नग रिंगपाने, दोन पक्कड, लहान कटर व मोठा कटर असे साहित्यही आढळून आले. घटनेची माहिती मिळताच नांदुरा पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपासादरम्यान पोलिसांनी प्रवेज उर्फ बबलू महबूब पिंजारी (वय ३५), मोहम्मद पिंजारी (वय स्पष्ट नाही) आणि ताफ मेहबूब पिंजारी (वय २९), सर्व रा. पिंप्राळा, जळगाव खान्देश, यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पांढऱ्या रंगाची बोलेरो गाडी क्रमांक एमएच २६ व्ही ०३१४, अंदाजे किंमत १ लाख ५० हजार रुपये, तसेच चोरीसाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणातील वाहिद गुल पिंजारी आणि शोएब शरीफ पिंजारी हे अन्य दोन आरोपी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी मधुकर मोतीराम लहासे (वय ५६, व्यवसाय पेट्रोलिंग ऑफिसर, एनआय ग्रुप कंपनी, पुणे, रा. साखळी बु., ता. जि. बुलढाणा) यांच्या फिर्यादीवरून नांदुरा पोलीस ठाण्यात अप. क्र. ७०८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३(४), ३२४(५) व ११५(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सोहम माछरे, पोलीस निरीक्षक जयवंत सातव आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमराज कोळी करीत आहेत.