Headlines

शेकडो सातबारा फेरफार नोंदींमध्ये अनियमितता; जिल्हाधिकाऱ्यांचा दणका! अमरावतीत ग्राम महसूल अधिकारी निलंबित; दोन महिन्यांत नायब तहसीलदारासह चौघांवर कारवाई

अमरावती : शेतजमिनीच्या मालकी हक्काशी संबंधित सातबारा उतारा हा महसूल व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज मानला जातो. मात्र, याच महसूल अभिलेखांमध्ये नियमांना बगल देत फेरफार नोंदींचा मनमानी कारभार सुरू असल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. शेकडो फेरफार नोंदींमध्ये अनियमितता, मंजुरीशिवाय सातबारा उताऱ्यावर नोंदींची अंमलबजावणी आणि एकाच क्रमांकाच्या दुबार नोंदी असे प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी कठोर भूमिका घेत ग्राम महसूल अधिकारी संतोष गाभीरराव चपटे यांना निलंबित केले आहे. विशेष म्हणजे, नियमबाह्य फेरफार प्रकरणात गेल्या दोन महिन्यांत नायब तहसीलदारासह चौघांवर कारवाई झाल्याने महसूल विभागात खळबळ उडाली आहे.
अमरावती तहसील अंतर्गत बेनोडा, वडाळी आणि अकोली भाग-९ या साजांमध्ये ग्राम महसूल अधिकारी म्हणून कार्यरत असताना संतोष चपटे यांच्या कार्यकाळातील हस्तलिखित तसेच संगणकीकृत फेरफार नोंदींची तपासणी करण्यात आली. उपविभागीय अधिकारी अनिल भटकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखालील चौकशी समितीने सादर केलेल्या अहवालातून अनेक गंभीर त्रुटी समोर आल्या. मौजा वडाळी आणि बेनोडा येथील शेकडो फेरफार नोंदींमध्ये मंडळ अधिकाऱ्यांची मंजुरी नसतानाही सातबारा उताऱ्यावर बेकायदेशीररीत्या अंमलबजावणी केल्याचे आढळले. याशिवाय एकाच फेरफार क्रमांकावर दोन नोंदी घेणे, तर काही फेरफार क्रमांक जाणीवपूर्वक अथवा निष्काळजीपणे गाळल्याचेही चौकशीत निष्पन्न झाले. या अनियमिततेबाबत संबंधित अधिकाऱ्याला नोटीस बजावून खुलासा मागविण्यात आला होता. चौकशीतील निष्कर्ष आणि उपलब्ध अहवालाच्या आधारे महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, १९७९ मधील नियम ४ (१) (अ) नुसार जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी चपटे यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय धारणी तहसील कार्यालय निश्चित करण्यात आले आहे. महसूल अभिलेखांच्या नोंदींमध्ये झालेल्या या गंभीर अनियमिततेमुळे महसूल विभागातील कामकाजाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी काळात या प्रकरणात आणखी काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *