Headlines

नागणगाव टी-पॉईंटवर तरुणाला अडवून बेदम मारहाण दगडाने मारल्याचा आरोप; पाच जणांविरुद्ध अंढेरा पोलिसांत गुन्हा

मेरा बु. : कामानिमित्त दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाला रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण करून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना नागणगाव टी-पॉईंट, खैरव येथे १८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडली. या घटनेप्रकरणी अंढेरा पोलिसांनी पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोहर नंदाजी सोसे (वय ३१, रा. खैरव) हे कामानिमित्त दुचाकीवरून जात होते. नागणगाव टी-पॉईंट येथे पोहोचले असता आरोपी निवृत्ती बद्रीनाथ सोसे व शिवानंद विठोबा सोसे हे त्यांच्या घरासमोर आले. यावेळी त्यांनी मनोहर सोसे यांना अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर विठोबा रंगनाथ सोसे व बद्रीनाथ कुंडलिक सोसे यांनी दगडाने मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याचदरम्यान आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही फिर्यादीने पोलिसांना सांगितले. या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी निवृत्ती बद्रीनाथ सोसे, शिवानंद विठोबा सोसे, विठोबा रंगनाथ सोसे, बद्रीनाथ कुंडलिक सोसे आणि माणिकराव कुंडलिक सोसे (सर्व रा. खैरव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ११८(१), ११५(२), १८९, १८९(२), १९०, १९१(२), ३५१(२), ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंढेरा पोलिसांकडून करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!