Headlines

माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासू-नणंदेविरुद्ध गुन्हा

मलकापूर : व्यवसायासाठी माहेरून पैसे आणावेत, अन्यथा घटस्फोट देण्याची धमकी, आजारपणाच्या कारणावरून मारहाण आणि घरकामावरून मानसिक त्रास, अशा आरोपांमुळे एका विवाहितेने पोलिसांत धाव घेतली. या तक्रारीवरून मलकापूर शहर पोलिसांनी पतीसह सासू व नणंदेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूर येथील शाहीनबी मलीक केसवाणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा विवाह मुस्लिम धर्मशास्त्राप्रमाणे गुजरातमधील वापी येथील मलीक करीम खान केसवानी यांच्यासोबत झाला. विवाहानंतर सुरुवातीचे दोन-तीन महिने सासरच्या मंडळींकडून चांगली वागणूक मिळाली. मात्र त्यानंतर परिस्थिती बदलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, २७ जून २०२२ ते २३ मार्च २०२६ या कालावधीत आजारपणाच्या कारणावरून विवाहितेला मारहाण करण्यात आली. तसेच पतीने व्यवसायासाठी माहेरून पैसे आणण्याचा तगादा लावला. पैसे न आणल्यास घटस्फोट देण्याची धमकी देत तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे. सासू दिलशाद करीम खान केसवानी हिने स्वयंपाकघरात येऊ न देता मोलकरणीसारखी वागणूक दिल्याचा, तसेच अपमानास्पद बोलून मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. नणंद करिष्मा करीम खान केसवानी हिने विवाहितेच्या मुलीला दत्तक देण्याची मागणी केली. मुलगी दत्तक न दिल्यास नांदू देणार नाही, अशी धमकी देत उपाशी ठेवून घरातील कामे करून घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. याशिवाय पोलिसांत तक्रार केल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
या तक्रारीवरून २२ सप्टेंबर रोजी मलकापूर शहर पोलिसांनी पती मलीक करीम खान केसवानी, सासू दिलशाद केसवानी आणि नणंद करिष्मा केसवानी, सर्व रा. मोहन नगर, उमरगाव, जि. वापी (गुजरात) यांच्याविरुद्ध अप. क्र. ७०५/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेतील कलम ८५, ३५१(२), ३(५) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!