बुलढाणा :- शहर परिसरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. राजूर घाटातील हनुमान मंदिराजवळील दरीत अंदाजे ३५ ते ४० वर्षीय पुरुषाचा मृतदेह आढळला, तर शहरालगतच्या जंगलात मानव जातीसदृश हाडांचा सांगाडा सापडला. दोन्ही घटनांची नोंद बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली असून, मृतांची ओळख पटविण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. राजूर घाटातील हनुमान मंदिराजवळील दरीत एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळून आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी मर्ग क्रमांक ३७/२०२६ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १९४ नुसार नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची उंची अंदाजे पाच फूट सात इंच असून त्याने आकाशी रंगाचा शर्ट आणि काळी पॅन्ट परिधान केली होती. शर्टवर इंग्रजीमध्ये ‘DIVISION (RAW) INDUSTRIAL DENIM’ असे लिहिलेले आहे. मृत व्यक्तीचा रंग निमगोरा असून, उजव्या हाताच्या पोटरीवर मराठीत ‘आई’ असे गोंदवलेले आहे. तसेच उजव्या छातीवरही गोंदवलेले चिन्ह असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. कमरेला काळ्या रंगाचा बेल्ट असून हाताची नखे वाढलेली आहेत. मध्यम दाढी आणि काळे केस ही त्याची अन्य शारीरिक वैशिष्ट्ये आहेत. दरम्यान, बुलढाणा शहर परिसरातील जंगलात दुसऱ्या व्यक्तीचा सांगाडा आढळून आल्याची घटना समोर आली आहे. वनरक्षक समाधान विक्रम साठे (वय ४३) हे १५ सप्टेंबर २०२५ रोजी बुलढाणा वर्तुळातील वनरक्षक व वनमजुरांसह जंगलात गस्त घालत होते. रात्री साडेअकराच्या सुमारास जंगलातील एका ठिकाणी झाडाला भगव्या रंगाचा रुमाल अडकलेला दिसल्याने त्यांनी त्या दिशेने जाऊन पाहणी केली. त्यावेळी मानव जातीसदृश हाडांचा सांगाडा आढळून आला. या घटनेची माहिती वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना देण्यात आल्यानंतर बुलढाणा शहर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मर्ग क्रमांक ०४/२०२५ अन्वये भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १७४ नुसार नोंद केली आहे. सांगाड्याजवळ हिरव्या-काळ्या रंगाची ट्रॅक पँट, NIKE कंपनीचे निळे पट्टे असलेले कपडे तसेच निळसर रंगाचा शर्ट आदी वस्तू आढळून आल्या. मृत व्यक्तीचा सांगाडा व हाडे कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. दोन्ही घटनांचा तपास बुलढाणा शहर पोलिसांकडून सुरू असून, या मृत व्यक्तींबाबत कोणाला माहिती असल्यास अथवा वरील वर्णनावरून ओळख पटत असल्यास बुलढाणा शहर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एम. जी. वाघमोडे यांनी केले आहे.