दुसरबीड : तब्बल पाच चोरट्यांनी मध्यरात्री कटरच्या सहाय्याने सराफा दुकानाचे शटर व कुलूप तोडून धाडसी चोरी केली. मात्र दुकानातील मौल्यवान दागिन्यांपर्यंत पोहोचण्यात त्यांना अपयश आल्याने चोरट्यांच्या हाती केवळ गल्ल्यातील सुमारे १ हजार ५०० रुपयांची रोकड लागली. ही घटना ३१ ऑगस्टच्या मध्यरात्री मलकापूर पांगरा येथे घडली असून, चोरीसाठी वापरलेले चारचाकी वाहनही चोरट्यांनी किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी करीत तपासाची चक्रे फिरविली असून, एका संशयिताला ताब्यात घेतल्याची माहिती आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, मलकापूर पांगरा येथील दिपाली ज्वेलर्स हे दुकान ३१ ऑगस्टच्या रात्री बंद असताना चोरट्यांनी दुकानाला लक्ष्य केले. सीसीटीव्ही फुटेजनुसार, रात्री सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास पाच चोरटे दुकानासमोर आले. त्यांनी कटरच्या सहाय्याने दुकानाचे शटर व कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातील गल्ला उचलून नेला. मात्र दुकानातील मौल्यवान सोन्या-चांदीच्या दागिन्यांपर्यंत त्यांना पोहोचता आले नाही. त्यामुळे एवढी मोठी धाडसी चोरी करूनही चोरट्यांच्या हाती केवळ सुमारे १ हजार ५०० रुपयांची रोकड लागल्याची माहिती आहे. चोरट्यांनी दुकानातील काचा व इतर साहित्याचीही तोडफोड केली. विशेष म्हणजे, चोरीची घटना घडविण्यासाठी चोरट्यांनी किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक चारचाकी वाहन चोरल्याचे तपासात समोर आले आहे. मलकापूर पांगरा येथून पसार होत असताना या वाहनाचे चेंबर फुटल्याने ते रस्त्यातच खराब झाले. त्यानंतर चोरट्यांनी दुसऱ्या वाहनाचा वापर करून जालन्याच्या दिशेने पलायन केल्याची माहिती आहे. दरम्यान, घटनेनंतर परिसरातील काही नागरिकांच्या हा प्रकार लक्षात आला. घटनास्थळी दिपाली ज्वेलर्सचे मालक वसंतराव उदावंत यांचा फोटो आढळून आल्याने नागरिकांनी त्यांच्याशी संपर्क साधून चोरीची माहिती दिली. उदावंत यांनी दुकानात येऊन पाहणी केली असता शटर तोडलेले असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. फॉरेन्सिक पथक तसेच श्वान पथकानेही घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी महत्त्वाचे पुरावे संकलित केले. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली आहेत. नाकाबंदी दरम्यान एका संशयिताला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. या धाडसी चोरीमुळे परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, अवघ्या अर्ध्या तासात चोरट्यांनी शटर फोडून चोरी करून पलायन केल्याने सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.