भरधाव पिकअपची दुचाकीला समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

मोताळा : बुलढाणा-मोताळा मार्गावर राजूर गावाजवळील पुष्ठा फॅक्टरीच्या वळणावर भरधाव बोलेरो पिकअपने दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात मोताळा येथील ४६ वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर दुचाकीवरील अन्य दोघे जखमी झाले. ही घटना २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी घडली असून, मृत्यूनंतर २९ ऑगस्ट रोजी बोराखेडी पोलिसांनी पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मोताळा येथील प्रभाग क्रमांक ८ मधील रहिवासी शेख रईस शेख रफीक यांनी बोराखेडी पोलिसात फिर्याद दिली. फिर्यादी शेख रईस, शेख फारुक शेख हबीब (वय ४६) आणि शेख मोहसीन शेख मुन्सी हे तिघे २२ ऑगस्ट रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता होंडा युनिकॉर्न दुचाकी क्रमांक एमएच २८ सीजी ००४८ ने बुलढाण्यावरून मोताळ्याकडे जात होते.
दरम्यान, बुलढाणा-मोताळा मार्गावरील राजूर गावाजवळील पुष्ठा फॅक्टरीच्या वळणावर समोरून येणाऱ्या बोलेरो पिकअप क्रमांक एमएच २८ एबी ५१७४ च्या चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून दुचाकीला समोरासमोर जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीवरील तिघेही रस्त्यावर फेकले गेले.
या अपघातात शेख फारुक शेख हबीब हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. तर अपघातात दुचाकीचे सुमारे ३ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी २९ ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलिसांनी बोलेरो पिकअप चालक सुधाकर रामचंद्र गायगोळ (वय ५६, रा. राजूर, ता. मोताळा) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम २८१, १०६ (१), ३२४ (१), १२५ (अ) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!