घराचा दरवाजा तोडताच समोर आला थरारक प्रकार; २५ वर्षीय युवकाची आत्महत्या

खामगाव : तालुक्यातील मांडका गावात एका २५ वर्षीय युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना २८ ऑगस्ट रोजी सकाळी उघडकीस आली. घराचा दरवाजा वारंवार ठोठावूनही प्रतिसाद न मिळाल्याने नातेवाईकांनी दरवाजा तोडला असता युवक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. निखिल अभिमन्यू खंडारे (२५, रा. मांडका) असे मृत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखिल खंडारे हा मांडका येथील आपल्या राहत्या घरी होता. २८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्याचे चुलत भाऊ अभिमन्यू खंडारे व त्यांच्या पत्नी सिरसगाव देशमुख येथून घरी आले. त्यांनी घराचा दरवाजा ठोठावून निखिलला आवाज दिला; मात्र घरातून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ दरवाजा उघडला जात नसल्याने संशय बळावला. अखेर नातेवाईकांनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता निखिल हा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हा प्रकार पाहताच कुटुंबीयांना धक्का बसला. घटनेची माहिती मिळताच पिंपळगाव राजा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून, युवकाने आत्महत्या करण्यामागील कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे समजते. पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!