टुणकी-लाडणापूर मार्गावर भीषण अपघात; आईसह ७ महिन्यांच्या चिमुकलीचा मृत्यू, संतप्त जमावाने वाहन पेटविले

संग्रामपूर : टुणकी-लाडणापूर रस्त्यावर मालवाहू वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत आईसह अवघ्या सात महिन्यांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी घडलेल्या या भीषण अपघातानंतर संतप्त नागरिकांनी मालवाहू वाहनाला आग लावत चालकाला मारहाण केल्याची माहिती आहे. घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मालवाहू वाहन क्रमांक एमपी १२ झेडएच ९३४२ ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात पूर्वी संजय वासकला (७ महिने) हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर तिची आई सपना संजय वासकला (२६, रा. जसुंदी, मध्य प्रदेश) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सनवीर संजय वासकला (६) व कमलेश भुरलाल चंगळ (३२, रा. मोरवा, ता. तेल्हारा, जि. अकोला) हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली. आई-मुलीच्या मृत्यूने संतप्त झालेल्या जमावाने मालवाहू वाहन पेटविल्याची तसेच चालकाला मारहाण केल्याची माहिती आहे. घटनास्थळी आलेली रुग्णवाहिकाही उलटविण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सोनाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. जखमी वाहनचालकावर प्राथमिक उपचारानंतर प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला अकोला येथे रेफर करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!