जामोद : सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह मजकूर व कमेंट प्रसारित झाल्याने जामोदमध्ये काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत जळगाव जामोद पोलिसांनी दोन इन्स्टाग्राम आयडीधारकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९९ व ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी हरिष घाटोळे, रा. जामोद यांनी जळगाव जामोद पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून शेख ऐहसान शेख इसाक व समीर या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे २.३० वाजता जामोद येथील काही युवकांच्या निदर्शनास संबंधित इन्स्टाग्राम आयडीवरील आक्षेपार्ह कमेंट आल्या. छत्रपती शिवाजी महाराज व अफजल खान तसेच छत्रपती संभाजी महाराज व औरंगजेब यांच्याशी संबंधित पोस्टवर आक्षेपार्ह मजकूर व कमेंट करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. हा मजकूर सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर जामोदमध्ये काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अप्पर पोलीस अधीक्षक जगताप यांनी जामोद येथे भेट देत नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले. यावेळी मलकापूरचे डीवायएसपी मछरे, जळगाव जामोदचे ठाणेदार सचिन बागुल, संग्रामपूरचे ठाणेदार श्रीकांत निचळ यांच्यासह पोलीस अधिकारी उपस्थित होते. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारी घेतली. दरम्यान, युवकाने दिलेल्या तक्रारीनंतर संबंधित दोन इन्स्टाग्राम आयडीधारकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. सोशल मीडियावर धार्मिक भावना दुखावणारा किंवा समाजात तेढ निर्माण होईल असा आक्षेपार्ह मजकूर प्रसारित करणे कायद्याच्या कचाट्यात येऊ शकते. त्यामुळे नागरिकांनी सोशल मीडियाचा वापर करताना जबाबदारीने व कायद्याच्या चौकटीत राहून पोस्ट, कमेंट अथवा अन्य मजकूर प्रसारित करावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.