मलकापूर : अज्ञात वाहनाने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी दुपारी उमाळी-वरखेड रस्त्यावर घडली. या अपघातात महिलेचा पती गंभीर जखमी झाला असून, मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
नांदुरा येथील मनोज लक्ष्मण राणे हे पत्नी रजनी राणे यांच्यासोबत दुचाकीने निंबादेवी येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शनानंतर ते दाताळा येथील नातेवाईकांच्या भेटीसाठी गेले आणि त्यानंतर नांदुरा येथे परतत असताना उमाळी गावाजवळील वळणावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.
धडकेनंतर रजनी राणे या रस्त्यावर फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर मनोज राणे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अंकित संजय राणे (वय २३) यांच्या फिर्यादीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या वाहनाचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.