Headlines

काटी गावात मध्यरात्री दरोडेखोरांचा धुमाकूळ; चोरांचा पाठलाग करणाऱ्या शेतकऱ्याचा निर्घृण खून, मलकापूर तालुक्यात खळबळ; एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोडी, लाखोंच्या मुद्देमालाची चोरी

मलकापूर : मलकापूर तालुक्यातील काटी गावात रविवारी पहाटे दरोडेखोरांनी घातलेल्या धुमाकुळामुळे संपूर्ण परिसर हादरला आहे. मध्यरात्रीच्या सुमारास गावात चोरीच्या उद्देशाने आलेल्या अज्ञात दरोडेखोरांनी तीन ठिकाणी घरफोडी केल्याची प्राथमिक माहिती असून, चोरांना पकडण्यासाठी त्यांचा पाठलाग करणाऱ्या रायसिंग सिताराम सोलंकी (वय ५२) यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या सोलंकी यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रविवार, ९ ऑगस्ट रोजी पहाटे २ ते ३.३० वाजेदरम्यान चार ते पाच अज्ञात व्यक्तींनी काटी गावात प्रवेश केला. गावातील काही घरे व दुकानांना लक्ष्य करत त्यांनी चोरी करण्यास सुरुवात केली.
गावात चोरी सुरू असल्याची चाहूल लागल्यानंतर शेती व दुग्धव्यवसाय करणारे रायसिंग सोलंकी यांनी चोरांचा पाठलाग केला. मात्र, आपण पकडले जाऊ शकतो हे लक्षात येताच दरोडेखोरांनी सोलंकी यांच्यावर हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्या डोक्यावर व शरीरावर काठी तसेच धारदार शस्त्राने वार करण्यात आले. गंभीर जखमी झाल्यानंतर ते घटनास्थळी कोसळले.
घटनेचा आवाज ऐकून गावकरी घटनास्थळी जमा झाले. गावकरी येत असल्याचे लक्षात येताच आरोपी मोटारसायकलवरून अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
एकाच रात्री तीन ठिकाणी चोरी
दरोडेखोरांनी काटी गावातील बाळू हरिश्चंद्र धांगे यांच्या घरातून सोन्याचे दागिने, संजय रामभाऊ हिवाळे यांच्या दुकानातून साड्या व रोकड, तसेच गणेश मानशिंग राठोड यांच्या घरातही चोरी केल्याचे समोर आले आहे. चोरीला गेलेल्या मुद्देमालाची नेमकी किंमत अद्याप स्पष्ट झालेली नाही.
रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रायसिंग सोलंकी यांना गावकऱ्यांनी तातडीने मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात नेले. मात्र, उपचार सुरू होण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या घटनेने कुटुंबीयांसह गावकऱ्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
तपासासाठी पोलिसांची पथके दाखल
घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील सुनील रत्नसिंग चव्हाण यांनी मलकापूर ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक नीलेश तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस अधिकारी, डॉग स्क्वॉड, फिंगरप्रिंट एक्सपर्ट आणि तांत्रिक पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.
पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात येत असून, आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास सुरू आहे.
एकाच रात्री चोरीच्या तीन घटना आणि त्यानंतर झालेल्या शेतकऱ्याच्या मृत्यूमुळे काटी गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, दरोडेखोरांना तातडीने अटक करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
चोरीच्या मुद्देमालाची रक्कम आणि घटनेतील इतर तपशील पोलिसांच्या अधिकृत तपासानंतर स्पष्ट होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!