Headlines

रामनगरात घरफोडी; सोन्याचे दागिने, रोकड लंपास

चिखली तालुक्यातील रामनगर येथे घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्याचे दागिने व रोकड असा सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. घरमालक नातेवाइकांकडे गेले असताना ही चोरी झाली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, अंढेरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
रामनगर येथील रामदास दिगंबर भगत हे ६ ऑगस्ट रोजी पत्नीसह नातेवाइकांकडे गेले होते. घर बंद असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने घराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर घरातील सोन्याचे दागिने आणि रोकड चोरून नेली. दरम्यान, ७ ऑगस्ट रोजी सकाळी शेजारी नवनाथ बहुले यांच्या निदर्शनास भगत यांच्या घराचा मागील दरवाजा उघडा असल्याचे आले. घरात चोरी झाल्याचा संशय आल्याने त्यांनी भगत यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. भगत यांनी घरी परतल्यानंतर घराची पाहणी केली असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. चोरट्याने सुमारे १० ग्रॅम वजनाची सोन्याची दाणेपोत, चार ग्रॅम सोन्याच्या झुंबरांचा जोड, दोन सोन्याच्या अंगठ्या आणि ३० हजार रुपये रोख असा एकूण सुमारे ७५ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी अंढेरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून चोरट्याचा शोध सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!