जळगाव जामोद :- गुप्त माहितीच्या आधारे जळगाव जामोद पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या धाडीत ‘एक्का-बादशाह’ जुगाराचा डाव उधळून लावत पाच जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत ८० हजार ७३० रुपयांचा मुद्देमाल व ५२ ताश पत्ते जप्त करण्यात आले असून, अंधाराचा फायदा घेत पसार झालेल्या ७ ते ८ जणांचा पोलीस शोध घेत आहेत. जळगाव जामोद ते बऱ्हाणपूर रोडलगत असलेल्या स्वाद ढाब्याच्या पाठीमागील टिनशेडमध्ये ताश पत्त्यांवर पैशांची हारजित लावून ‘एक्का-बादशाह’ हा जुगार सुरू असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने पंचांसह सापळा रचून मध्यरात्री सुमारे १.१० वाजता छापा टाकला. छापा पडताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. काही जणांनी टिनशेडच्या मागील शेतातून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून शेख करीम शेख अमीर, दीपक नारायण हिस्सल, वसीम खान मेहमूद खान, शेख गफूर शेख अमीर आणि जावेद खान गुलाब खान या पाच जणांना ताब्यात घेतले. आरोपींच्या अंगझडतीत तसेच जुगाराच्या डावातून मिळून ८० हजार ७३० रुपयांची रोख रक्कम आणि ५२ ताश पत्ते पंचांसमक्ष जप्त करण्यात आले. या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम ४ व ५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, अंधाराचा फायदा घेत पसार झालेल्या ७ ते ८ संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पीएसआय गणेश कायंदे हे पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.