मलकापूरात नकली नोटांचा सुळसुळाट; व्यापाऱ्यांना सावध राहण्याचे आवाहन; ५० ते १०० रुपयांची खरेदी करून ५०० रुपयांच्या बनावट नोटा खपविण्याचा प्रकार उघड

मलकापूर : शहरात नकली नोटांची मालिका सुरू असतानाच आता व्यापाऱ्यांची फसवणूक करण्याचा एक नवीन प्रकार समोर आला आहे. काही अनोळखी महिला ५०० रुपयांच्या बनावट नोटा घेऊन विविध व्यावसायिकांकडे जात असून किरकोळ खरेदी करून चलनातील खऱ्या नोटा घेऊन पसार होत असल्याची माहिती पुढे आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला ५० ते १०० रुपयांपर्यंतची किरकोळ खरेदी करून त्याबदल्यात ५०० रुपयांची नोट देतात. व्यापारी व्यवहार पूर्ण करून उर्वरित रक्कम परत देतात. मात्र नंतर नोट तपासल्यानंतर ती बनावट असल्याचे लक्षात येते. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. असाच प्रकार मलकापूर बसस्थानक परिसरातील एका व्यावसायिकाच्या दुकानात घडला. संबंधित महिला सलग दोन दिवस एकाच ५०० रुपयांच्या नोटेसह खरेदीसाठी आल्या होत्या. संशय आल्याने व्यावसायिकाने नोटेची बारकाईने तपासणी केली असता ती बनावट असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे संभाव्य फसवणूक टळली. या घटनेची माहिती संबंधित व्यावसायिकाने मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांना दिली आहे. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी व्यापारी व नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी सांगितले की, शहरात संशयित व्यक्तींकडून बनावट नोटा खपविण्याचे प्रकार होत असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कोणतीही संशयास्पद व्यक्ती अथवा नोट आढळल्यास तत्काळ मलकापूर शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा. तसेच मोठ्या मूल्यांच्या नोटा स्वीकारताना त्यांची खातरजमा करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे. या प्रकारामुळे शहरातील व्यापारी वर्गात चिंता व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!