खामगाव पोलिसांची गोवंश तस्करीविरोधात मोठी कारवाई; १४ जनावरांची सुटका, २२ लाखांचा मुद्देमाल जप्त

खामगाव :- गोवंश जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करून त्यांची तस्करी करणाऱ्यांविरोधात खामगाव शहर पोलिसांनी गुरुवारी सकाळी धडक कारवाई केली. टॉवर चौक परिसरात नाकाबंदी दरम्यान तीन संशयित वाहने पकडून १४ गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली असून सुमारे २२ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील व शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठांच्या आदेशानुसार शहरातील टॉवर चौक परिसरात पोलिसांनी नाकाबंदी केली होती. यावेळी संशयित वाहनांची तपासणी केली असता गोवंश जनावरांची अत्यंत क्रूर व अमानुष पद्धतीने वाहतूक केली जात असल्याचे उघड झाले. वाहनांमध्ये जनावरे कोंबून भरल्याने त्यांना हालचालीसाठी जागा नव्हती. तसेच चारापाणी व इतर आवश्यक सुविधांचा अभाव असल्याने जनावरांना त्रास होत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.
पहिल्या कारवाईत मलकापूर येथील अलियार खान असगर खान (वय ३०) याला टाटा इंट्रा वाहनासह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चार गोवंश जनावरे व वाहन असा ७ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला./दुसऱ्या कारवाईत मुक्ताईनगर येथील सलमान मुसा खाटीक (वय ३०) याला बोलेरो पिकअपसह पकडण्यात आले. त्याच्याकडून चार गोवंश जनावरे आणि वाहन मिळून ५ लाख ८५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर तिसऱ्या कारवाईत नांदुरा तालुक्यातील खंडाळा येथील दीपक सत्तू मेढे (वय ४२) याला बोलेरो पिकअपसह अटक करण्यात आली. त्याच्याकडून पाच गोवंश जनावरे व वाहन असा ९ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिन्ही प्रकरणांमध्ये प्राण्यांशी क्रूरतेने वागणूक प्रतिबंधक अधिनियम, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. प्राथमिक तपासात ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!