सामाईक विहिरीच्या हिस्स्यावरून शेतात वाद; परस्परविरोधी तक्रारींवरून चौघांविरुद्ध गुन्हे

मेरा बु.:- शेतातील सामाईक विहिरीच्या हिस्स्यावरून दोन कुटुंबांमध्ये वाद निर्माण होऊन शिवीगाळ, धक्काबुक्की आणि जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याची घटना मेंडगाव शिवारात घडली. या प्रकरणी दोन्ही बाजूंनी अंढेरा पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्याने पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे नोंदवून चौघांविरुद्ध कारवाई केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मेंडगाव येथील उषाबाई दत्तात्रय गीते आणि काशिनाथ शंकर घुगे यांची शेतजमीन शेजारी असून त्या ठिकाणी एक सामाईक विहीर आहे. विहिरीलगत असलेल्या माती व दगडांच्या ढिगाऱ्यामुळे शेतीकामात अडथळा येत असल्याने तो हटविण्याचा प्रयत्न सुरू असताना दोन्ही पक्षांमध्ये वाद झाला. उषाबाई गीते यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, विहिरीलगतचा माती-दगडांचा ढिगारा काढण्यासाठी गेल्यानंतर काशिनाथ घुगे यांनी विहिरीत स्वतःचा हिस्सा असल्याचे सांगत कामास विरोध केला. यावेळी त्यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी काशिनाथ शंकर घुगे (रा. मेंडगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ३५१(२) व ३५२ अन्वये गुन्हा दाखल केला.
दरम्यान, काशिनाथ घुगे यांनीही पोलिसांकडे स्वतंत्र तक्रार दाखल केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, २ जून रोजी सकाळी शेतातील मोटार सुरू करण्यासाठी विहिरीजवळ गेल्यानंतर उषाबाई गीते, दत्तात्रय उत्तम गीते आणि गौरव दत्तात्रय गीते हे जेसीबीच्या सहाय्याने विहिरीतील माती काढत होते. विहीर सामाईक असल्याने नियमानुसार काम करण्यास सांगितले असता तिघांनी शिवीगाळ केली तसेच धक्काबुक्की करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या तक्रारीवरून अंढेरा पोलिसांनी उषाबाई दत्तात्रय गीते, दत्तात्रय उत्तम गीते आणि गौरव दत्तात्रय गीते (सर्व रा. मेंडगाव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम २९६, ११५(२), ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंढेरा पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!