मलकापूर : तालुक्यातील सिरसोडी शिवारातील वडोदा रेल्वे परिसरातील वीज वितरण कंपनीच्या डीपीवरील सुमारे ९० हजार रुपयांच्या विद्युत तारा अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे प्रधान तंत्रज्ञ अमोल भास्कर सावळे यांनी याबाबत तक्रार दाखल केली. २० मे रोजी सायंकाळी ७ ते २१ मे रोजी सकाळी ८ वाजेदरम्यान अज्ञात चोरट्यांनी मलकापूर ग्रामीण भागातील वडोदा रेल्वे डीपीवरील २० गाडे वरील विद्युत तार, अंदाजे ८० हजार रुपये किमतीची, तसेच दोन पीसी पोलवरील तुटलेल्या तारांचा अंदाजे १० हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. या चोरीमुळे वीज वितरण व्यवस्थेचे नुकसान झाले असून संबंधित भागातील वीजपुरवठ्यावरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात अप. क्र. ९३/२०२६ नुसार भारतीय विद्युत कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार उल्हास मुके करीत आहेत.