नांदुरा:- गाईला हाकलण्यासाठी पूर्णा नदीच्या काठावर गेलेल्या 23 वर्षीय तरुणाचा पाय घसरून नदीच्या पाण्यात बुडाल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना पातोंडा शिवारात घडली. या घटनेमुळे आलमपूर गावासह परिसरात हळहळ व्यक्त होत असून, मृत तरुण हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने शोककळा पसरली आहे. नांदुरा तालुक्यातील आलमपूर येथील तुषार रामदास तायडे (वय 23) हा कोठारी महाविद्यालय, नांदुरा येथे शिपाई म्हणून कार्यरत होता. तसेच तो आपल्या जनावरांची देखभालही करत होता. पातोंडा शिवारातील उमेश कुवारे यांच्या गोठ्यावर त्याच्या गाई राहत असल्याने तुषार दररोज जनावरांना पाणी पाजण्यासाठी आणि त्यांची देखरेख करण्यासाठी तेथे जात असे. गुरुवारी (21 मे) दुपारी त्याची एक गाय पूर्णा नदीपात्राच्या दिशेने गेल्याने तिला परत आणण्यासाठी तुषार नदीकाठावर गेला. यावेळी त्याचा तोल जाऊन पाय घसरल्याने तो थेट पाण्यात पडला. पोहता न आल्याने अथवा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो बुडाला आणि त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. शवविच्छेदनानंतर आलमपूर येथे शोकाकुल वातावरणात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.