अर्टिगा कारमधून बकऱ्यांची चोरी; पिंप्री देशमुख येथील घटना

खामगाव : तालुक्यातील पिंप्री देशमुख येथे चोरट्यांनी थेट चारचाकी वाहनाचा वापर करत सात बकऱ्या लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पहाटेच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात आरोपींनी पांढऱ्या रंगाच्या अर्टिगा कारमधून ही चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याबाबत महादेव संतोष दांडगे (वय ४२, रा. पिंप्री देशमुख, ता. खामगाव) यांनी खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दांडगे यांनी त्यांच्या घरासमोरील कुंपणात सुमारे २० बकऱ्या बांधून ठेवल्या होत्या. मात्र ४ मे रोजी पहाटेच्या सुमारास त्यातील सात बकऱ्या अचानक गायब झाल्याचे आढळून आले. चोरीची माहिती मिळताच परिसरात शोधाशोध करण्यात आली. दरम्यान, शेजारी राहणारे भैयाभाऊ अंमलकार यांनी रात्री अंदाजे ३ वाजताच्या सुमारास कुंपणाजवळ पांढऱ्या रंगाची अर्टिगा कार उभी असल्याचे पाहिल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर अज्ञात चोरट्यांनी अंदाजे ५६ हजार रुपये किमतीच्या सात बकऱ्या कारमध्ये टाकून पळ काढल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास खामगाव ग्रामीण पोलीस करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!