खामगाव :- तालुक्यातील पिंप्री देशमुख येथे शेतीच्या पैशांवरून सुरू असलेल्या जुन्या वादातून भावानेच भावाला चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फिर्यादी प्रफुल्ल शालीग्राम वसतकार (वय ३२, रा. पिंप्री देशमुख) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३ मे रोजी सकाळी सुमारे १०.३० वाजता ते त्यांच्या बांधकाम सुरू असलेल्या घराजवळ गेले असता आरोपी भावासोबत पैशांवरून वाद झाला. हा वाद वाढत जाऊन आरोपीने संतापाच्या भरात चाकू दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली.
या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फिर्यादीच्या तक्रारीवरून खामगाव ग्रामीण पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.