मलकापूर : पूर्वी दाखल केलेला रिपोर्ट मागे घेण्यासाठी दबाव टाकत एका महिलेला अश्लील शिवीगाळ करून विनयभंग तसेच तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना दाताळा येथे घडली. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी एका आरोपीविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सौ. जनाबाई समाधान भोलाने (वय ३६) रा. दाताळा, ता. मलकापूर यांनी मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ६ मे रोजी सकाळी सुमारे ११.१५ वाजताच्या दरम्यान त्या व त्यांचे पती घरी असताना आरोपी चंद्रकांत उत्तम सपकाळ हा त्यांच्या घरासमोरील रस्त्यावर येऊन मोठमोठ्याने शिवीगाळ करू लागला. यावेळी भोलाने दाम्पत्याने आरोपीस शिवीगाळ करण्याचे कारण विचारले असता, त्याने “शुभम संजय कांडेलकर यांच्याविरोधातील रिपोर्ट मागे घेणार की नाही?” असा जाब विचारला. त्यावर “आम्ही रिपोर्ट मागे घेणार नाही,” असे सांगितल्यानंतर आरोपी अधिक संतप्त झाला. त्याने महिलेला अश्लील शिवीगाळ करत विनयभंग केला तसेच तिच्या पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. याशिवाय “तुमच्याविरुद्ध खोटे गुन्हे दाखल करतो,” अशी धमकीही दिल्याचे तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी मलकापूर ग्रामीण पोलिसांनी आरोपी चंद्रकांत उत्तम सपकाळ याच्याविरुद्ध गुन्हा क्र. ८४/२०२६ अन्वये कलम ७९, २९६, ३५२, ३५१ (२), (३) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.