मलकापूर : मलकापूर शहरात नकली नोटांच्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्यानंतर आता या प्रकरणाच्या अनुषंगाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे या कारवाईसाठी बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेचे (एलसीबी) पथक मलकापूरात येऊन सापळा रचते आणि आरोपींना रंगेहात पकडते, ही बाबच शहरातील नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. त्यामुळे मलकापूर शहर पोलीस नेमके काय करत होते? असा सवाल सर्वसामान्य नागरिकांकडून उपस्थित होत आहे.
मलकापूर शहरात मागील काही काळापासून नकली नोटांची देवाणघेवाण, लोकांना आमिष दाखवून फसवणूक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बनावट नोटांची सौदेबाजी अशा घटना अधूनमधून समोर येत आहेत. त्यामुळे ही बाब आता नित्याचीच झाल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पोलिसांना याची माहिती नसणे किंवा त्यावर ठोस कारवाई न होणे ही बाब संशयाला वाव देणारी ठरत आहे. दरम्यान, शहरात अशीही चर्चा रंगू लागली आहे की या रॅकेटला खाकीतील काहींचा छुपा पाठिंबा तर नाही ना? काहींच्या मते, चार ते पाच पोलीस कर्मचारी या अवैध व्यवहारातून ‘मलाई’ खाण्याचे काम करत असल्यामुळेच हे रॅकेट इतक्या काळापासून बिनधास्त सुरू होते, असा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळेच मलकापूर पोलिसांच्या नाकावर टिचून बुलढाणा एलसीबीला कारवाई करावी लागली, अशी टीकाही होत आहे. याबाबतची सत्यस्थिती पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. या प्रकरणात अटक केलेल्या आरोपींच्या मोबाईल फोनची सीडीआर (Call Detail Record) आणि एसडीआर तपासणी केल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आरोपींच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींची माहिती समोर आल्यास खाकीतील गद्दार कोण आहेत, याचेही उत्तर मिळू शकते, अशी चर्चा शहरात सुरू आहे. मलकापूरमध्ये या प्रकरणावरून पडद्यामागे अनेक धागेदोरे असल्याची कुजबुज सुरू असून खाकीतील काहींचे ‘दगडाखाली हात’ असल्याची चर्चा नागरिकांमध्ये जोर धरत आहे. त्यामुळे आता या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे आरोपींची कसून चौकशी करण्याचे आदेश देऊन त्यांच्या मोबाईलचे सीडीआर-एसडीआर तपासून या रॅकेटमागील खरे सूत्रधार आणि पडद्यामागे असलेले खाकीतील गद्दार उघड करतात का, हे पाहणे आता अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. त्यामुळे या प्रकरणातून आणखी कोणती नावे समोर येतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, या प्रकरणातील अटक आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या तीन दिवसांत पोलिसांकडून नेमका कोणता तपास केला जातो, आरोपींच्या मोबाईलचा सीडीआर-एसडीआर तपासून कोणते धागेदोरे समोर येतात आणि या रॅकेटमागील पडद्यामागील सूत्रधार उघडकीस येतात का, याकडे संपूर्ण मलकापूर शहरासह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. याबाबत अधिकृत माहिती पोलीस तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.